सरपंच, उपसरपंचांचे मानधन बँक खात्यात जमामाय अहमदनगर वेब टीम
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन दिले जात आहे. याआधी केवळ सरपंचांना मानधन देण्यात येत होते. त्यानुसार उपसरपंचांना एकूण 8 महिन्यांच्या एकत्रित मानधनापोटी पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आली आहे. तसेच सरपंचांच्या बँक खात्यांत 22 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचे देखील मोठे योगदान असते. त्यामुळे गावाच्या विकासात महत्त्वाचा सहभाग देणार्‍या उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन देता आले नव्हते. उपसरपंचांना मानधन ऑनलाईन देण्याची कार्यप्रणाली तयार करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उपसरपंचांना एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले

असून ही रक्कम एकुण 15.72 कोटी इतकी आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 24 हजार 485 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

जिल्ह्यातील उपसरपंचांना दिलासा
नगर जिल्ह्यात 1318 ग्रामपंचायती असून यापूर्वी केवळ सरपंचांना मानधन दिले जात होते. पण आता उपसरपंचांना प्रथमच एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील उपसरपंचांना दिलासा मिळाला आहे. 2001 ते 8 हजार लोकसंख्येसाठी उपसरपंचांना एक ते दोन हजार रुपये एवढे मानधन सुरू करण्यात आलेले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post