चिनी वस्तूंचा निषेध अंगलट; २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी दिल्ली गेट येथे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला गेला. हा निषेध शिवसेना पदाधिकार्‍यांचा अंगलट आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह 25 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. भादंवि कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्या नियमांचा भंग केल्याची घटना समोर आली आहे. चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी अकरा वाजता दिल्ली गेट येथे चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला गेला. यावेळी शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, विक्रम राठोड, माजी नगरसेवक सुरेश तिवारी, संतोष गेनप्पा व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर नियमांचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post