सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने लांबणीवर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने काढले आहे. यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, बाजार समित्या, गृहनिर्माण संस्था अशा अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका आता सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत.
राज्यात करोना विषाणूमुळे उद्भवणार्या संसर्गजन्य आजारामुळे राज्यात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती आहे.साथरोग 1897 च्या खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे.सध्याच्या करोना विषाणूंमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता करोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी राज्याचा लॉकडाऊन कालावधी 30 जून 2020 पर्यंत वाढविलेला आहे.
अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही कालावधी लागणार आहे.रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ सुरू आहे.अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित नसल्याचे शासन आणि सहकार खात्याचे मत आहे.सहकारी संस्थांच्या निवडणुका निर्भय,मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 क मधील तरतुदीनुसार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील उर्वरीत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अशोक, मुळा, ज्ञानेश्वर, श्रीगोंदा, कुकडी, वृध्देश्वर साखर कारखाने तसेच श्रीरामपूर, राहाता आणि राहुरी बाजार समित्या, नगर शहर बँक तसेच अनेक विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. करोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी यापूर्वी 18 मार्च 2020 च्या शासन आदेशाने सहकारातील निवडणुकांना तीन महिने स्थगिती देण्यात आली होती. ती आता पुन्हा तीन महिने वाढली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या संचालक मंडळाला आणखी तीन महिने कारभार करण्याची संधी करोनाने मिळवून दिली आहे.
जिल्हा बँकेचा मतदार यादीचा कार्यक्रम सुरू होता. तसेच मुळा साखर कारखान्याच्या निवडणुकीची छाननी झाली होती. ज्ञानेश्वर कारखान्याची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. अशोक कारखान्याची मतदार यादी प्रसिध्द झाली होती. त्यावर हरकतीचा कार्यक्रम सुरू होता. पण कर्जमाफी झाल्यानंतर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर करोनाचे संकट उभे राहिल्याने या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Post a Comment