हवामानात पुन्हा अनपेक्षित बदल, आता मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्रावर पावसाचे सावट
माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - काेराेनाचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाचे सावट आहे. राज्यात ११ मार्चला कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी घसरून ३१ अंशांवर आले. सोमवारी त्यात पुन्हा ४ अंशांनी वाढून सरासरी ३५ अंशांपर्यंत गेले. याचबरोबर १७ ते २२ मार्चदरम्यान औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिंद महासागरावरील दाट ढगांचे आच्छादन, महाराष्ट्रासह विविध भागावर तयार झालेला कमी हवेच्या दाबाचा पट्टा, ४ दिशेकडून वाहत येणारे थंड, उष्ण, बाष्पयुक्त वारे, होणारे ढग व त्यात पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता यामुळे तापमानात अनपेक्षित चढउतार होत आहे. जेथे सापेक्ष आर्द्रता १०० टक्के, पोषक वातावरण तयार होते तेथे पाऊस अन् गारपीट होते. महाराष्ट्रात बदलणारे हे वातावरण काेराेना व्हायरससाठी पाेषक असल्यामुळे चिंता वाढली आहे.
नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमानात ६ अंशांपर्यंत घट होऊन वातावरणात गारवा जाणवेल. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा आदी रोगांचा उपद्रव वाढू शकताे.
Post a Comment