चिकन खाल्ल्याने कोरोना होतो अशी अफवा परवणा-या विरोधात गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत नाही. तरीही कोरोनाच्या भीतीने अनेकांनी चिकन आणि अंडी खाणे बंद केले आहे. अशाच प्रकारची खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या दोन जणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे लोक सोशल मीडियावर कुकुट पालन आणि कोरोना व्हायरसचा संबंध जोडून अफवा पसरवत होते. यातील एक जण अल्पवयीन असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तर दुसरा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. यासोबतच, पुण्यात कुठल्याही प्रकारची संचारबंदी किंवा जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही. तसेच असा पुणे प्रशासनाचा विचार सुद्धा नाही अशी स्पष्टोक्ती सह-पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी केली.
कुकुट व्यवसायाला कोरोनाचा फटका
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका सध्या चिकन विक्रेता आणि पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना बसला आहे. विविध ठिकाणी पोल्ट्री व्यवसायाला अंदाजे 3600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चिकन अगदी 10 रुपये किलो आणि अंडी 1 रुपये भावाने विकण्याची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी कोंबडी पोसणे सुद्धा कठिण झाल्याने व्यावसायिक सामूहिक कोंबडी पुरणे किंवा मोफत वाटण्याचे काम करत आहेत. चिकन आणि पोल्ट्री व्यावसायिकांना प्रत्यक्षात कोरोना नव्हे, तर कोरोनावरील अफवांचा खऱ्या अर्थाने फटका बसला आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबूकसह इतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर आरोग्य तज्ञांनी सुद्धा आपले मत दिले. त्यानुसार, चिकन आणि अंडी खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो हा तर्क चुकीचा ठरवण्यात आला. विशेष म्हणजे, चिकन खाल्ल्याने कोरोनासारख्या रोगांविरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती वाढते. तरीही बाजारात पसरलेल्या अफवांमुळे आज घडीला कुणी चिकन विकत घेण्यास तयार नाही.
Post a Comment