सलग 14 गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरला




माय अहमदनगर वेब टीम
सोलापूर - साेलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडीच्या हद्दीत घरगुती गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. त्यानंतर १४ सिलिंडरचे एकामागे एक स्फोट सुरू झाले. अागीचे उंचच उंच लोळ उठले. सगळा परिसर हादरून गेला. अर्धातास हा थरार सुरू होता. उडालेले सिलिंडर घटनास्थळापासून ५० ते ६० फूट अंतरावर फेकले गेले होते. काळपट पत्रे सर्वत्र विखुरले गेले होते. चालकाने प्रसंगावधान राखून तामलवाडी गावापासून ट्रक दूर नेला. त्यामुळे सुदैवाने इतरत: नुकसान झाले नाही.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा सुमारास ही घटना घडली. सोलापूर आणि तुळजापूर येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या लगेच घटनास्थळी धावल्या. अर्ध्यातासात त्यावर नियंत्रणही मिळवले. स्फोटामुळे दोन्ही बाजूंना दीड-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गॅस भरलेले २०० सिलिंडर या ट्रकमध्ये होते. सोलापूरहून उस्मानाबादच्या नीरज गॅस सर्व्हिसकडे हा ट्रक निघाला होता. सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी चालकाच्या केबिनमध्ये छोटीशी आग लागल्याचे लक्षात आले. चालकाने तामलवाडीपासून ट्रक दूर नेऊन थांबवला. आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु ती अधिक भडकली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post