पारनेरमध्ये गोळीबारत महिला ठार


माय अहमदनगर वेब  टीम
पारनेर : तालुक्यातील वडझिरे येथे (ता.17)रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमका कोणत्या कारणातून ही घटना घडली हे समजू शकले नाही.

सविता सुनील गायकवाड (वय 35)  असे या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादात एका तरुणाने स्वतः कडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्याने एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या हाताच्या पंजाला दुसरी मानेला तर तिसरी गोळी कानाजवळ घुसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोळीबारानंतर ते दोघे तरूण पळून गेले. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post