बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरवात


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून (मंगळवार) सुरू होणार आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. राज्यभरातून या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 17 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनींचा समावेश आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा एक ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पार पडली असून मंगळवारपासून (18 फेब्रुवारी) लेखी परीक्षेला सुरवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यात एकूण 9 हजार 923 कनिष्ठ महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा 3 हजार 36 केंद्रांवर घेतली जाणार आहे, असेही डॉ. काळे यांनी सांगितले. परीक्षेसाठी मंडळातर्फे ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यात आली असून, विद्यार्थ्यांना हॉल तिकिटही ऑनलाईन उपलब्ध केले आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एकूण 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. महिलांचे विशेष पथकही त्यात असेल. नऊ विभागीय मंडळात स्वतंत्र हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास परवानगी नाही, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post