महाविकास आघाडीच्या उमेदवाला होणार मोठा फायदा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धुरळा उडला असून आता महापालिका पाठोपाठ कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होवू शकते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या गट-गणातील वातावरण तापायला सुरुवात झालीय. वाळकी गणातून गेल्या 15-20 वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात दबदबा असलेल खडकी गावचे आदर्श सरपंच, उद्योजक प्रविण कोठुळे यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. कोठुळे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे वाळकी गटाचे उमदेवार बाळासाहेब हराळ यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
महापालिका पाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील वातावरणात ऐन हिवाळ्यात गरमागरमी सुरु झालीय.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामे यशस्वीरीत्या मार्गी लावून लोकांचा विश्वास संपादन केलेल्या प्रवीण कोठुळे यांनी आता वाळकी जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शाळा, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले.
ग्रामपातळीवर विकासकामांची अंमलबजावणी करताना मिळालेला अनुभव आणि विकासाची स्पष्ट जाण यामुळेच मोठ्या स्तरावरही प्रभावी काम करता येईल, असा विश्वास प्रविण कोठुळे यांनी व्यक्त केला आहे. पंचायत समिती स्तरावर संधी मिळाल्यास वाळकी गटातील प्रत्येक गावात विकासाचा वेग वाढवून शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
कोठुळे वाळकी गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने वाळकी गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आदर्श कामांमुळे मिळाला आदर्श सरपंच पुरस्कार
खडकी गावचे तब्बल 9 वर्ष प्रविण कोठुळे यांनी सरपंच पद भूषविले. खडकी सेवा सोसायटीचे चेअरमन पदही त्यांनी भूषविले. सरपंच पदाच्या माध्यमातून त्यांनी गावात विकास कामांचा डोंगर उभा केला. त्यामुळेच कोठुळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे. कोठुळे याचा जनसंपर्क बाबुर्डी बेंद, सारोळा कासार, हिवरे झरे, देऊळगाव, घोसपुरी, देऊळगाव सिद्धी आणि वाळकीमध्ये दांडगा आहे. प्रविण कोठुळे यांच्या उमेदवारीमुळे गावातूनही एकमुखी पाठिंबा मिळू शकतो असे गावातील राजकारणी मंडळी सांगतायेत.

Post a Comment