न्यायालयीन अपील असलेल्या नगरपरिषदांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचा निर्णय;
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने (रा.नि.आ.) न्यायालयीन अपील दाखल झालेल्या आणि नियमबाह्य निवडणूक चिन्ह वाटपामुळे प्रभावित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. २९/११/२०२५ रोजी जारी झालेल्या या आदेशामुळे, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेला आता नवीन गती मिळणार आहे.
या आदेशानुसार, ज्या सदस्य जागांसाठी जिल्हा न्यायालयातील अपिलाचा निकाल २३/११/२०२५ किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, त्या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तसेच, अशा प्रकरणांमध्ये अध्यक्षपदाचा समावेश असल्यास, त्या संपूर्ण नगरपरिषदेची/नगरपंचायतीची निवडणूकही स्थगित झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने हे वृत्त महत्त्वाचे आहे, कारण येथील देवळाली प्रवरा, कोपरगाव, नेवासा, आणि पाथर्डी या चार नगरपरिषदांच्या निवडणूका आता सुधारित कार्यक्रमानुसार होतील.
नवीन वेळापत्रकानुसार, जिल्हाधिकारी ०४/१२/२०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करतील. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १०/१२/२०२५ दुपारी ३.०० वाजेपर्यंत असून, निवडणूक चिन्ह वाटप ११/१२/२०२५ रोजी होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक आता २० डिसेंबर २०२५ (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०) असेल, तर मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची तारीख २१ डिसेंबर २०२५ (सकाळी १०.०० वाजल्यापासून) ठेवण्यात आली आहे. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेल्या जागांची माहिती तात्काळ आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment