माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – जिल्ह्यातील घटते लिंग गुणोत्तर रोखण्यासाठी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी, संशयित प्रकरणांची चौकशी व जन्म–मृत्यू नोंदी वेळेत करण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. कोणत्याही केंद्राकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एचपीव्ही लसीकरण कृती दल, नियमित लसीकरण, लिंग गुणोत्तर, गर्भलिंग तपास प्रतिबंधक कायदा (PCPNDT), जन्म–मृत्यू नोंदणी, क्षयरोग नियंत्रण व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, कार्यक्रम अधिकारी संजय कदम, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व पंचायत समित्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत १४ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना एचपीव्ही लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, सर्व खासगी रुग्णालयांनी प्रसूतींच्या नोंदी आरोग्य वाहिनी माहिती प्रणाली (HMIS) संकेतस्थळावर अनिवार्यपणे नोंदवणे, नवजात बालकांना २४ तासांत हेपेटायटिस-बी (शून्य) लसीचा डोस देणे, खासगी डॉक्टरांनी क्षयरोग रुग्णांची माहिती व उपचार अहवाल वेळेवर सादर करणे याबाबत सूचना करण्यात आल्या.
याशिवाय, गरोदर मातांच्या नियमित पाठपुराव्यात ढिलाई होऊ नये, गावस्तरीय समित्यांनी मासिक आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांक सुधारण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व नागरिकांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Post a Comment