माय नगर वेब टीम
पुणे : सिंहगड किल्ल्यावर ‘आपला गड, आपली जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “गड-किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. मी खासदार म्हणून नव्हे, तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे,” असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले.
सकाळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समाधीस्थळावर जिजाऊ वंदना आणि संवर्धन प्रतिज्ञेनंतर मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गडावरील २१ पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणांची स्वच्छता केली.
कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, पुरुष बालेकिल्ला, राजाराम महाराज समाधी परिसर, तानाजी मालुसरे समाधी परिसर अशा प्रमुख ठिकाणी प्लास्टिक, काच, कागद, काटेरी झुडपे, वाळलेले गवत काढण्यात आले. पायवाटा खुल्या करण्यात आल्या.
या मोहिमेत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिताताई इंगळे , सुरेखाताई दमिष्टे , इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, पद्माकर लायगुडे निलेश द मिस्टेक दीपक खिरीड अनिकेत चव्हाण वरीष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर , सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब इंगळे,‘आपला मावळा’ संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, यांसह नगर, सातारा, सांगली आणि पुण्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंसेवक व सहभागींंची संपूर्ण व्यवस्था धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष अनिकेत चव्हाण यांनी केली. भोजनाची व्यवस्था दीपक खिरीड यांनी गोरे बुद्रुक येथील धर्माजी बाबा मंदिर परिसरात केली.
आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याच्या एका रविवारी विविध किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा राबवण्यात येत आहेत. शिवनेरी, रायरेश्वर, भुदरगड, धर्मवीर गड, तिकोना, येथेही यापूर्वी अशीच मोहीम पार पडली आहे.
खासदार लंके यांचा संदेश
“गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा, यासाठी आम्ही या मोहिमेचा संकल्प केला आहे,” असे खासदार लंके यांनी सांगितले.
सिंहगड – इतिहासाचा जिवंत साक्षीदार
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर पार पडलेली ही मोहीम गडसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. शेकडो शिवभक्तांच्या सहभागामुळे ‘आपला गड आपली जबाबदारी’ हा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला.
खासदार लंके हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सामील
मोहीमेत स्वतः खासदार नीलेश लंके यांनी झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. किल्ल्यावरील प्रमुख परिसरात सौरदिवे, कचराकुंड्या, लोखंडी बाकडे आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले. पर्यटकांनी गडावर स्वच्छता राखावी, कचरा फेकू नये, अशी आवाहनपर पाट्याही लावण्यात आल्या.
शिवरायांच्या जन्माची गरज
मालेगाव मध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराविषयी पत्रकारांनी खासदार नीलेश लंके यांना विचारले असता ते म्हणाले महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आता खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज आहे.

Post a Comment