ग्रामीण भागात दिवसा वीज द्या ; खासदार नीलेश लंके यांची महावितरणला सूचना

 


जिल्ह्यात बिबट्यांचा  सुळसुळाट


अहिल्यानगर : प्रतिनिधी 

    जिल्ह्यात वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात दिवसा पूर्ण क्षमतेने व दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची ठाम आणि तातडीची मागणी खासदार नीलेश लंके यांनी महावितरण मंडळाकडे केली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्यांची दहशत वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर लंके यांनी पाठवलेल्या पत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

         अहिल्यानगर, नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मानवी वस्त्यांमध्ये देखील त्यांच्या वारंवार हालचाली दिसत असल्याने लोकांच्या मनात तीव्र भीती पसरली आहे. अलीकडेच अहिल्यानगर शहरातही बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण आणखीनच गडद झाले आहे.

          दैनंदिन वृत्तपत्रांतून शेतकरी, लहान मुले, पाळीव जनावरे अशांवरील हल्ल्यांच्या घटना सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात संध्याकाळीनंतर नागरिक अत्यंत घाबरून हालचाल करत आहेत.

            महावितरणकडून रात्रीच्या वेळी सिंचनासाठी वीजपुरवठा केला जातो. मात्र बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

खासदार लंके म्हणतात “भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाऊ शकत नाहीत. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे आणि जीवितहानीचीही शक्यता वाढते आहे.”

          या पार्श्वभूमीवर अनेक गावांतून दिवसा वीजपुरवठा वाढवण्याच्या, तसेच पूर्ण दाबाने देण्याच्या तक्रारी व विनंत्या वाढल्या आहेत.खासदार लंके यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जिल्हा प्रशासन, वनविभाग आणि महावितरण यांनी समन्वय साधून तातडीने विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत :


बिबट्या-प्रभावित गावांत दिवसा पूर्ण क्षमतेने व स्थिर दाबाने वीज द्या, वनविभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून तात्पुरती ‘विशेष  योजना’ राबवावी, देखभाल किंवा अनपेक्षित कारणांनी होणारे वीजव्यत्यय पूर्णपणे टाळण्यासाठी अशा गावांना प्राधान्य द्यावे,गरज भासल्यास जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आपत्कालीन योजना तयार करण्यात यावी, असेही खा. लंके यांनी सुचवले आहे.

          पत्राच्या शेवटी खासदार लंके यांनी स्पष्ट केले आहे की, “तातडीने निर्णय घेतला तर संघर्षग्रस्त गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि संभाव्य अपघात टाळणे शक्य होईल.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post