एआय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे



अहिल्यानगर जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक संपन्न

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर– जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआय आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या.

ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, समितीचे सदस्य सचिव व विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ, सौ. अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, दादासाहेब वाघुलकर, मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कुहाडे व किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक श्री. घार्गे म्हणाले, वनविभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मानव–बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. वन्यप्राणी अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखणे, तसेच अस्तित्वातील आणि नव्या विहिरींना सुरक्षित कठडे बांधण्याबाबत शेतकरी व संबंधित विभागांना आवाहन करण्यात यावे. मानव–वन्यजीव संघर्षाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत तत्परतेने उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देणे, वनविभाग–पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल आयोजित करणे, तसेच तालुकास्तरीय समन्वय समित्या स्थापन करून त्यांची नियमित बैठक घेणे याबाबत सविस्तर चर्चा झाली.

जिल्ह्यातील अलीकडील मानव–बिबट्या संघर्षाच्या घटनांचा आढावा उपवनसंरक्षक श्री. सालविठ्ठल यांनी बैठकीत सादर केला. भविष्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांवरही चर्चा झाली.

गावपातळीवर “वन पाटील” ही मानद संकल्पना राबविण्याबाबत बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. वन व वन्यजीव संवर्धनात रुची असलेल्या इच्छुक व्यक्तींना या मानद पदासाठी निवड करून शासनास प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले.

वनविभाग–पोलीस विभागातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी बैठकीत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post