भारत-पाक क्रिकेटच का? सगळंच बंद करा – शोएब अख्तर



माय अहमदनगर वेब टीम
इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील क्रिकेट मालिकेचं समर्थन केलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये व्यापार सुरु आहे, इतर खेळांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळतात, मग क्रिकेटमध्येच नेमकी काय समस्या आहे. शोएब अख्तरने आपल्या यू ट्युब चॅनलवर, भारत-पाक क्रिकेट मालिका होऊ न देण्यासाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर नाव न घेता टीका केली.

“जर भारत आणि पाकिस्तान डेव्हिस चषकात सामना खेळू शकतात, कबड्डीत हे दोन्ही संघ समोरासमोर येतात, तर मग क्रिकेटमध्ये काय प्रॉब्लेम आहे. असं असेल तर दोन्ही देशांमधला व्यापार आणि इतर सर्व खेळांमधले सामने खेळणंही रद्द करा. जेव्हा कधीही क्रिकेट मालिकेचा मुद्दा येतो, त्याला राजकीय वळण दिलं जातं. हे खूप निराशाजनक आहे. आपण इतर मुद्द्यांवर बोलू शकतो, तर मग क्रिकेट का खेळू शकत नाही”, शोएबने आपलं मत मांडलं.

यावेळी बोलत असताना शोएब अख्तरने, तटस्थ ठिकाणी दोन देशांमध्ये मालिका खेळवली जाऊ शकते असंही मत मांडलं. “सध्या दोन्ही संघ एकमेकांच्या देशात जाऊ शकत नाही, पण तटस्थ ठिकाणांवर हे सामने खेळवले जाऊ शकतात.” काही दिवसांपूर्वी युवराज सिंह आणि शाहीद आफ्रिदी या माजी खेळाडूंनीही भारत-पाक क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post