माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सुधारित नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध दर्शवीत नागरिकत्व संशोधन विधेयक (एनआरसी व कॅब) संविधान विरोधी व घटनाबाह्य असल्याचा आरोप करीत बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षणाच्या कार्यालयाच्या मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन नागरिकत्व संशोधन विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात बाळासाहबे मिसाळ, शौकत तांबोली, राजेंद्र करंदिकर, राजेंद्र थोरात, संजय सावंत, डॉ.परवेझ अशरफी, अतुल भालेराव, अविनाश देशमुख, मौलाना खलील रहेमान नदवी, दादा शिंदे, गणेश चव्हाण, डॉ.परवेझ अशरफी, संजय संसारे, साहेबान जहागीरदार, शहानवाझ तांबोली, मोहसीन शेख, संतोष वाघमारे, सुभाष गायकवाड, मुशाहिद शेख, अक्षय भालेराव, आबिद दुल्हेखान, शाह फैसल, एजाज सय्यद, नईम सरदार, आजीम राजे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर तीव्र शब्दात टिका केली.
देशातील भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी सरकार आहे. या सरकारने आणलेला नागरिकत्व संशोधन विधेयक घटनाबाह्य आहे. तसेच ते संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. सदर कायद्याने देशात जातीय तेढ व दुफळी निर्माण होवून देशाच्या एकात्मतेला बाधा येणार असल्याचे निवेदनात म्हंटले, देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी नागरिकत्व संशोधन विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
Post a Comment