केडगावच्या स्वाभिमानासाठी 'अपक्ष' पॅनल मैदानात!



 कोथरूडचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, रेणुका मातेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटला

अहिल्यानगर : 

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक १६ मध्ये एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे. केडगावचा 'स्वाभिमान' आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी चार तरुण उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. २ जानेवारी रोजी ग्रामदैवत रेणुका माता आणि भैरवनाथ यांचे दर्शन घेऊन या पॅनलच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला. केडगावच्या विकासाचा नवा आराखडा घेऊन अ गट विमल दादू कांबळे, ब गट सविता अशोक कराळे, क गट सागर अंजाबापू सातपुते, ड गट भूषण अशोक गुंड हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आमच्या नेत्यांनी केडगावकरांना कोथरूडसारखा विकास करण्याचे जे स्वप्न दाखवले होते, ते आजही अधुरेच आहे. केडगावातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्यासाठी आणि केडगावकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई आम्ही हाती घेतली आहे असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.


प्रचाराची सुरुवात करताना उमेदवारांनी प्रथम केडगाव वेस येथील भैरवनाथांचे दर्शन घेतले. त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामदैवत रेणुका मातेच्या चरणी साकडे घालून "केडगावच्या उज्वल भविष्यासाठी शक्ती द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली.


प्रभागातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत समस्या आजही कायम असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. "हा अपक्ष अर्ज केवळ निवडणुकीपुरता नसून केडगावच्या अस्तित्वाचा लढा आहे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, विठ्ठल कराळे, पोपट कराळे, अंजाबापू सातपुते, गोविंद कोतकर, सुनील उमाप, पोपट साठे, सुभाष कार्ले, माजी नगरसेवक, प्रभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post