नुकसानीच्या पाहणीसाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथकाचे आगमन





माय नगर वेब टीम
शिर्डी – जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज 23 रोजी रोजी जिल्हा दौर्‍यावर आले आहे. येथील शासकीय विश्रामगृहात हे पथम मुक्कामाला असून विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पथकाची भेट घेऊन त्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रनिहाय झालेले नुकसान, खरीप हंगामावर झालेला परिणाम तसेच येणार्‍या रब्बी हंगामावर होणार्‍या परिणामाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पथकाला दिली. पथकातील सदस्यांनी नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण कसे केले यासंबंधी विचारले असता जिल्हाधिकारी यांनी गावनिहाय क्षेत्रीय कर्मचारी जसे तलाठी, ग्रामसेवक व कृषिसहायक यांना त्यांच्यास्तरावर गावे नेमून दिली होती. तसेच जिल्हा प्रशासनाने या कामाचा दैनंदिन आढावा घेतल्यामुळे पंचनामे वेळेवर होण्यास मदत झाल्याचे निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात सुमारे 450 कोटी रुपयांचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले असल्याची माहिती त्यांनी पथकाला दिली.

केंद्रीय पथकातर्फे आज प्रत्यक्ष पाहणी
जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय केंद्रीय पथकाचे आज शिर्डी येथे आगमन झाले. हे पथक 24 नोव्हेंबर रोजी राहाता तालुक्यातील साकुरी, दहेगाव कोर्‍हाळे, अस्तगाव, बाभळेश्वर, श्रीरामपूर तालुक्यातील दिघी, संगमनेर तालुक्यातील सादतपूर व जवळे कडलग येथे भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post