माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सावेडीत कपड्यांना इस्त्री करण्याच्या व्यवसायातून उपजीविका करणाऱ्या सोमनाथ आदमाने या कलावंताने चित्रकौशल्यही विकसित केले असून, त्याच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीतील ललित कला अकादमीत येत्या २३ ते २९ डिसेंबरदरम्यान होणार आहे.
नगरच्या प्रगत कला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेतल्यावर आदमाने यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून बी.एफ. ए. पेंटिंग आणि एम. एफ. ए. प्रिंट मेकिंगचा अभ्यास केला आहे. कौटुंबिक लाँड्री व्यवसाय करताना चित्रकलेतही त्यांनी प्रगती केली आहे. त्याचे २०१४मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीला पहिले प्रदर्शन झाले असून, त्यानंतर २०१५ आर्टिस्ट सेंटर (मुंबई) येथे तसेच २०१६ व १७मध्ये राज्यात विविध ठिकाणी चित्र प्रदर्शने झाली. २०१८ मध्ये परत जहांगीर आर्ट गॅलरीला त्यांचे चित्रप्रदर्शन झाले होते व आता २०१९च्या अखेरीस ललित कला आर्ट गॅलरीत (नवी दिल्ली) प्रदर्शन होत आहे.
उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या इस्त्रीला केंद्रीभूत ठेवून तिच्या माध्यमातून चित्राविष्कार आदमाने यांनी साकारला आहे. दिल्लीत होणाऱ्या त्यांच्या ‘आत्मप्रतिकृती’ प्रदर्शनात विविध आकारात रेखाटलेली इस्त्री चित्रे आणि जलरंगांसह विविध रंगांचा वापर करून रंगवलेली चित्रे मांडली जाणार आहेत. दिल्लीच्या ललित कला अकादमीमध्ये स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होत आहे. प्रदर्शनात वास्तववादी व अमूर्तवादी चित्रांची शृंखला मांडणार आहे. यातील चित्रे अॅक्रेलिक रंगात कॅनव्हॉसवर तसेच एमडीएफ बोर्डवर मिक्स मीडियामध्ये साकारली आहेत. या चित्रशृंखलेमध्ये लाँड्री व्यवसाय केंद्रस्थानी ठेवला आहे. विचारांची व आत्मचिंतनाची गुंफण या चित्रप्रदर्शनामध्ये केली आहे, असे त्याने सांगितले. दिल्लीच्या रवींद्र भवनातील (फिरोजशहा रोड, नवी दिल्ली) ललित कला अकादमीच्या तीन क्रमांकाच्या गॅलरीत त्यांचे ‘आत्मप्रतिकृती’ चित्र प्रदर्शन होणार आहे.
Post a Comment