आठवणीतील डॉ. श्रीराम लागु



माय अहमदनगर वेब टीम
मराठी रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते, जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे मराठी रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते म्हणून जेवढे योगदान आहे, तेवढेच योगदान पुरोगामी विचाराचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत म्हणूनही होते. म्हणूनच ते आपल्यातील लोकप्रिय अभिनेत्याचा अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

१९९५ च्या दशकात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम मोठ्या जोमाने सुरू होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाखा सुरू करून अंधश्रद्धा निर्मूलन, भोंदूबाबांचा भंडाफोड, विविध न्याय हक्कांसाठी लढे, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन रुजविण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे, व्याख्याने, अनिस वार्तपत्राचे सभासद वाढवणे अशी अनेक कामे जोमाने सुरू होती.


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनिसच्या शाखा सुरू केल्या होत्या. नगर जिल्ह्यावर त्यांचे विशेष प्रेम होते, असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही. १९९५ मध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीची शाखा सुरू झाली. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील कॉ. बाबा आरगडे हे महाराष्ट्र अनिस चे कार्यवाह होते त्यांच्या पुढाकारातून शेवगाव इंग्लिश स्कुलचे उपक्रमशील शिक्षक रामचंद्र तावरे यांच्याकडे अनिस च्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी तर न्यू आर्ट्स कॉलेज चे प्राध्यापक किसनराव माने यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यावेळी प्रा. चंद्रकांत पाचुंदकर, के.एस.सय्यद, बबनराव धावणे, विजय हुसळे, गणपत शेलार, कारभारी गायकवाड, जनार्धन लांडे, शाम पुरोहित, कैलास जाधव, भाऊसाहेब शिंदे, बाबासाहेब तिकोने, राजू इंगावले या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनिस च्या शेवगाव शाखेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. नेवासा तालुक्यातील डॉ. मच्छीन्द्र वाघ यांनी शाळा महाविद्यालयात जाऊन भोंदूबाबांच्या चमत्काराचे प्रात्यक्षिके सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जागविण्याचे काम केले.

याच काळात शुक्रवार दि. २९/९/१९९५ रोजी सकाळी १० वाजता शेवगाव बसस्थानकासमोरील सहकार सभागृहात 'विवेक जागराचा वाद-संवाद' या कार्यक्रमाअंतर्गत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच काळात डॉ. श्रीराम लागू यांनी परमेश्वराला रिटायर्ड करा असा परखड लेख लिहला होता. या लेखावर महाराष्ट्रातील पुरोगामी आणि प्रतिगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. अशा वातावरणात महाराष्ट्र अनिस चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे डॉ. श्रीराम लागू यांची मुलाखत घेणार होते.


या मुलाखतीसाठी अनिस चे कार्यवाह कॉ. बाबा आरगडे हे पुण्याहून डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना घेऊन आदल्या दिशवी म्हणजेच गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी अनिस च्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र तावरे यांच्या नेवासा रोडवरील निवासस्थानी घेऊन आले होते. डॉ. लागू यांच्या खाण्या-पिण्याची पथ्ये संभाळण्याची जबाबदारी कॉ. बाबा आरगडे घेत असत. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. तावरे सरांनी काही निवडक कार्यकर्त्यांना घरी बोलले होते त्यामध्ये मी व कैलास जाधव यांचा समावेश होता. तावरे सरांनी माझा व कैलास जाधव अशा दोन तरुण कार्यकर्त्यांचा डॉक्टरांना परिचय करून दिला. आम्ही त्यांचा सोबत नाश्ता केला. त्यावेळी त्यांच्यासोबत काही बोलण्याइतकी वैचारिक प्रगल्भता आमच्यात आलेली नव्हती. १० वा. आम्ही सर्वजण सहकार सभागृहात गेलो. तेथे त्यावेळी न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य असणारे खासेराव शितोळे देखील उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये देव, धर्म आणि जातीचा आधार घेण्याऐवजी विवेकाचा आधार घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे, असे परखड मत त्यांनी मांडले. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रतिगामी विचारांच्या काही व्यक्तींनी त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. लागूंनी त्यांच्या सर्व प्रश्नाला अत्यंत शांतपणे समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमानंतर तावरे सरांच्या निवासस्थानीच मान्यवरांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर सहकार कारखाना व मुळा सहकारी कारखाना येथेही डॉ. श्रीराम लागू व डॉ . नरेंद्र दाभोलकर यांचा कार्यक्रम झाला. अंनिसच्या कामानिमित्त डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. श्रीराम लागू अनेकदा नगर जिल्ह्यात येत असत. कॉ. बाबा आरगडे यांचे चिरंजीव भारत आरगडे याच्या सत्यशोधकी पद्धतीने झालेल्या विवाहासाठीही डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. श्रीराम लागू आले होते. त्यानंतर २००० मध्ये शनिशिंगणापूर येथे झालेला स्त्री पुरुष समानता लढा, तरवडीतील मुकुंदराव पाटील जयंती सोहळा अशा कार्यक्रमासाठी नरेंद्र दाभोलकर व डॉ. श्रीराम लागू अनेकदा नगर जिल्ह्यात आले होते. शनी शिंगणापूर च्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशबंदीचा विषय एकेकाळी देशभर गाजला. या स्त्री स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन प्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा आढाव, एन. डी. पाटील, व्यंकटराव रणधीर, माजी आमदार कॉ. पी.बी.कडू पाटील, कॉ. स्मिता पानसरे देखील उपस्थित होते. यावेळी शनिशिंगणापूर च्या स्त्री स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल डॉ. श्रीराम लागू यांना एक दिवसाची शिक्षाही झाली होती. अहमदनगर जिल्हा कारागृहातुन ही शिक्षा भोगून बाहेर आले तेव्हा डॉ. लागू म्हणाले होते की, मी अनेक चित्रपटातून खोट्या जेल मध्ये गेलो मात्र आज स्वातंत्र्यात देखील स्त्रीयांच्या न्याय हक्कासाठी लढतांना खऱ्या खुऱ्या जेलमध्ये जाण्याची वेळ आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post