बँक अधिका-याकडुन डॉक्टरला धमकी!


जेऊर येथील राष्ट्रियकृत बँकेतील घटना

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील जेऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक अधिका-याने डॉक्टरला शिवीगाळ करुन धमकी देण्याचा प्रकार घडल्याने नागरीकांमधुन संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील डॉक्टर राजेंद्र पवार यांना महाराष्ट्र बँकेच्या जेऊर शाखेतून फोन करून बँकेच्या नविन कर्जा विषयी माहिती देण्यात आली. त्याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टर पवार हे पत्नी व दोन मित्रांसह बँकेत गेले असता तेथील अधिकारी व काही कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना अरेरावी करून उद्धटपणे वागणूक दिली. तसेच शिवीगाळ करत धमकी दिली याबाबत डॉक्टर राजेंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जेऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्रा कर्मचारी व अधिकाऱ्यांबाबत कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. येथील अधिकाऱ्यांकडून ग्राहकांनाही नेहमीच अरेरावी व उद्धटपणा चा अनुभव आलेला आहे. महाराष्ट्र बँकेच्या कामकाज व अधिका-यांच्या मनमानी कारभारा विरोधात ग्रामसभेमध्ये निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. जेऊर पंचक्रोशीतील अनेक गावांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राची जेऊर शाखा हि एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने शासनाच्या विविध योजना व कर्ज प्रकरणांसाठी नागरिकांना येथे यावेच लागते.

बँक ऑफ महाराष्ट्राचे बहुतेक खातेदार हे शेतकरी आहेत तर तेथील अधिकारी व काही कर्मचारी हिंदी भाषिक आहेत त्यामुळे त्यांची भाषा शेतकऱ्यांना समजण्यास अडचणी निर्माण होतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खातेदारांची, कर्जदारांची नेहमीच पिळवणूक होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रा मध्ये कायमच संगणक प्रणाली बंद राहते. तसेच अनेक समस्या असल्याने दुसरी राष्ट्रीयकृत बँक गावांमध्ये आणण्याबाबत ग्रामसभेने ठराव घेतलेला आहे परंतु दुसरी राष्ट्रीयकृत बँक गावात येण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडुन ना हरकत दाखल्याची आवश्यकता आहे. परंतु तो दाखला देण्यात येत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये महिला बचत गटांचे कर्ज प्रकरणे ही मोठ्या प्रमाणात असून त्यांचीही तेथे नेहमीच अडवणूक करण्यात येत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. जिल्हा उद्योग केंद्र तसेच मुद्रा लोन व इतर कर्ज प्रकरणांबाबत जेऊर शाखेकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरू आहे.याबाबत गावचे सरपंच मधुकर मगर यांनी सहका-यांसोबत बँकेच्या वरिष्ट अधिका-यांकडे यापुर्वीच तक्रार केलेली आहे.

डॉक्टर राजेंद्र पवार हे गावातील प्रतिष्ठित वैद्यकीय व्यवसायातील नागरिक असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची बँकेत थकबाकी नसताना बँकेतील अधिकाऱ्यांकडून त्यांना अरेरावी व धमकी देण्याचा प्रकार घडला. डॉ. पवार यांनी जिल्हाधिकारी व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बँकेतील तक्रारींचा पाढाच वाचला आहे. डॉ. राजेंद्र पवार यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.


'असुन अडचन नसुन खोळंबा'
जेऊर परिसरातील डोंगरगण, ससेवाडी, बहिरवाडी, खोसपुरी, धनगरवाडी, इमामपूर, मजले चिंचोली या गावांसाठी राष्ट्रीयीकृत बँक म्हणून जेऊर ची एकमेव शाखा आहे. परंतु येथील संगणक प्रणाली कायमच बंद तसेच तेथील अधिकाऱ्यांची अरेरावी व कर्ज प्रकरणां बाबत होणारी पिळवणूक यामुळे जेऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र 'असून अडचण नसून खोळंबा बनली' आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post