सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळायलाच पाहिजे - खा. नीलेश लंके
खा. लंके यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करत खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
पत्रकारांशी बोलताना खा. लंके म्हणाले की, शिस्पे घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे अडकले असून अनेकांनी दोन पैशांच्या आशेने गुंतवणूक केली आणि त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. काही दुर्दैवी ठेवीदारांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे या घोटाळ्याची सखोल, निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
खा. लंके म्हणाले, “ज्यांनी हा घोटाळा केला आहे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून ठेवीदारांचे पैसे वसूल करून सर्वसामान्य नागरिकांना परत मिळाले पाहिजेत.” सिस्पे घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण काही ठेवीदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. हा विषय राजकीय न करता केवळ ठेवीदारांचे पैसे मिळवून देणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून राजकीय आकसापोटी आपल्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत खा. लंके यांनी विखे पिता–पुत्रांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. “स्वतःचे झाकून ठेवायचे आणि दुसऱ्यांचे उघडे करायचे, हीच त्यांची सवय आहे,” असे ते म्हणाले.
खा. लंके पुढे म्हणाले की, सिस्पे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मात्र जेव्हा केंद्रीय मंत्री लोणी किंवा कोपरगावच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवेदन का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी विखे यांचे नाव न घेता उपस्थित केला. ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याऐवजी काहीजण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी डाव आखले जात असले तरी नगर जिल्ह्यातील मतदार सुज्ञ असून भाजपची खेळी सर्वांनी ओळखली असल्याचे लंके यांनी सांगितले. नगर येथील सभेत मुख्यमंत्री शहरातील रस्ते घोटाळ्यावर एक शब्दही न बोलल्याची टीकाही त्यांनी केली.
जिल्ह्यात दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडले असून त्यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खा. लंके यांनी केली. ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह इतर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेवगाव येथे शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी शिस्पे घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याची घोषणा केल्यावर प्रतिक्रिया देताना खा. लंके म्हणाले, “जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाच राज्याच्या पोलिसांवर विश्वास नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?” श्रीरामपूर आणि शिर्डी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनांचीही सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
.....जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे नियमितपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून सुरू असल्याचा आरोप खा. लंके यांनी केला. पोलीस दलावर वारंवार टीका करून काही नेते जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करत असून कार्यक्षम अधिकाऱ्यांना नामोहरम करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
. .. दरम्यान, शिस्पे–इन्फिनिटी घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे खा. नीलेश लंके यांनी ठामपणे स्पष्ट केले. केवळ इन्फिनिटीच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलो म्हणून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून हा राजकीय हेतूने चालवलेला खोटा प्रचार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाला विविध पक्षांचे आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी उपस्थित होते. “उद्घाटनाला उपस्थित राहणे म्हणजे घोटाळ्यात सहभागी असणे नव्हे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी कोणालाही पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केलेले नसून, उलट ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप करत काही ठिकाणी धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा विचार महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून नगर शहराने शांतता, विकास आणि पारदर्शक कारभारासाठी या विचारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही खासदार नीलेश लंके यांनी केले.
महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, रखडलेल्या विकास योजना, पाणीपुरवठा व मनमानी कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment