‘स्वच्छता व पर्यावरण’ शिक्षणाची विद्यार्थ्यांना गरजेची




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्वच्छता व पर्यावरण हे विषय मनुष्य जीवनाशी अत्यंत निगडीचे आहे. यासाठी विद्यार्थी शालेय जीवनात शिक्षण घेत असताना त्यांना सामाजिक उपक्रमाचे धडे दिले पाहिजे. यासाठी गुलमोहोर रोड येथील आनंद विद्यालय येथे ‘स्वच्छता व पर्यावरण’ या विषयावर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्यावतीने निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन आज पारितोषिक वितरण करण्यात आले. बालवयातच सामाजिक प्रश्नाची जाणीव तसेच स्वच्छता व पर्यावरण विषयामध्ये शासनाबरोबर जनतेने सहभागी होणे गरजेचे आहे. जनतेशिवाय या योजना यशस्वी होऊ शकत नाही. स्वच्छतेमुळे मनुष्याचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहते. भारत देशात युवकांची संख्या खूप मोठी आहे. आपल्या भारत देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी आजच्या युवकाने शासनाच्या कल्याणकारी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष चौधरी यांनी केले.
आनंद विद्यालय येथे ‘स्वच्छता व पर्यावरण’ या विषयावर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्यावतीने निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन पारितोषिकाचे वितरण करताना पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव सोनवणे, सचिव किसन तरटे, दौलत शिंदे, शरद झंवर, विश्वनाथ पोखरकर, दिलीप अकोलकर, विनोद बजाज, मुख्याध्यापक प्रदीप दांगट, शारदा पोखरकर, अ. सू. जाधव, कमल खिलवाणी, किशोर वेरुलकर, नितीन राठोड, अभिजित भालेराव, पूनम नारनवरे, शारदा पोवार आदींसह शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी चौधरी पुढे म्हणाले की, भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी युवकांना आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये सहभागी व्हावे, देशाला महासत्तेकडे घेऊन जावे, या उपदेशांनी सर्वांनी काम केले पाहिजे. स्वच्छतेबाबत संत गाडगेबाबांची शिकवण प्रत्येकांनी अंगीकारली पाहिजे. स्वच्छता व पर्यावरण व त्याचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रत्येकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनवणे म्हणाले की शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याला सामाजिक कामाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येकाने आपले काम केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या शहराच्या विकास कामामध्ये योगदान दिले पाहिजे. स्वच्छ सुंदर व हरित शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या सामाजिक उपक्रमाचे आम्ही कौतूक करतो. त्यांनी सुरु केलेल्या दर गुरुवारी स्वच्छता अभियानामध्ये आमच्या शाळेतील एका इयत्तेचा वर्ग सामील होईल व सावेडी उपनगरातील नागरिकांनी या अभियानात सामील होऊन आपल्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडावी. यावेळी आनंद विद्यालयाच्या वतीने स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post