सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अहमदनगरमध्ये आरपीआयचे लाक्षणिक उपोषण



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवीत नागरिकत्व संशोधन विधेयक (एनआरसी व कॅब) रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्यावतीने मार्केडयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भारतीय संविधानाचा जयघोष करीत भाजप सरकार हुकुमशाही व जातीयवादी असल्याच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या लाक्षणिक उपोषणात आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, अझहर सय्यद, मतीन शेख, किरण दाभाडे, अजिंक्य भिंगारदिवे, नईम सरदार, सोमा शिंदे, नितीन घोडके, भिम वाघचौरे, अजीम राजे, वसिम शेख, फिरोज पठाण, नईम शेख, डॉ.इलियास शेख, अशोक केदारे, जावेद शेख, सय्यद शहा फैसल, रेहान बेग आदींसह युवक सहभागी झाले होते.

देशातील भाजप सरकारने पारित केलेला नागरिकत्व संशोधन विधेयक (कॅब) व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (एनआरसी) हे या देशातल्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक आहे. सदर विधेयक संयुक्त राष्ट्र संघ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असून, हे विधेयक भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. भारतीय संविधानाचे कलम 14 आणि 15 भारतीय राज्यकर्त्यांना कोणत्याही माणसाला कायद्यासमोर बरोबरीच्या हक्कांना बाधा पोहचविण्यास आणि धर्म, जातीच्या आधारे भेदभाव करण्यासाठी परवानगी देत नाही. हे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाले असले तरी, हे विधेयक भारतीय संविधानाच्या मूळ आत्म्याला आघात पोहचवीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.




घटनाबाह्य, असंविधानिक व अमानवीय विधेयकाचा निषेध करण्यासाठी देशातील धर्मनिरपेक्ष जनता आंदोलन करीत असल्याचे स्पष्ट करीत सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्यावतीने करण्यात आली आहे. तर या कायद्याला संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post