कल्याण रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
नागरिकांमध्ये घबराट; पोलिसांच्या गस्तीची मागणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरालगतच्या कल्याण रोड परिसरातील विविध वसाहतींमध्ये गेल्या 10-15 दिवसांपासून चोरट्यांचा वावर वाढला असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रीच्यावेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी दत्ता गाडळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत कोतवाली पोलिसांना दिलेल्या निवेदनात गाडळकर यांनी म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरात गेल्या 10-15 दिवसांपासून रात्रीच्यावेळी चोरट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागे राहून खडा पहारा द्यावा लागत आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात अनेकदा दुरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे. आजपर्यंत छोट्या-मोठ्या चोर्या झाल्या असून पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या दरोड्यासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने याची दखल घेत रात्रीच्यावेळी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी गाडळकर यांनी केली आहे.
Post a Comment