केडगाव अंधारात ; चोरट्यांना रान मोकळे



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- केडगाव व उपनगरांमधील बरेच पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. बंद पडलेल्या पथदिव्यामळे परिसरांमध्ये सर्वत्र अंधार पसरलेला असुन भुरटया चो-यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तातडीने बंद असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करून ते सुरु करावेत अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी शनिवारी (दि.२१) दुपारी महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की, केडगांव व उपनगरांमधील बरेच पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. पथदिवे दुरुस्ती करणेकरीता साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे सदरील पथदिवे बंद आहेत. पथदिव्यांची दुरुस्ती करणेबाबत परिसरातील नागरीक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करतात. वेळप्रसंगी आम्ही आमच्या स्वतःच्या पैशामधुन पथदिव्यांची दुरुस्ती करीत असतो. केडगांव व उपनगरांमधील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याकरीता भरपुर खर्च करावा लागणार असुन एवढा खर्च आम्ही करु शकत नाही. विद्युत विभाग प्रमुख यांच्याकडे पथदिवे दुरुस्ती करणेकरीता साहित्याची मागणी केल्यास ते म्हणतात की, महानगरपालिकेकडे कोणतेही विद्युत साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला विद्युत साहित्य देऊ शकत नाही.

आम्हांला जनतेने निवडुन दिलेले असुन जनतेच्या मुलभूत नागरी समस्या प्राधान्याने सोडविणे हे आमचे कर्तव्य आहे, जनतेच्या नागरी समस्या आम्ही सोडवु शकत नसल्यामुळे विनाकारण आम्हांला नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर विद्युत साहित्य उपलब्ध करुन दिल्यास केडगांव व उपनगरांमधील बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरुस्ती करता येईल व नागरीकांची गेल्या अनेक दिवसांपासुनची समस्या दूर होईल.असे नगरसेवक मनोज कोतकर यांनी म्हंटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post