कँटोन्मेंट बोर्डाची निवडणूक पक्षचिन्हावरच घ्यावी - भाजपा


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- भिंगार येथील अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डाची आगामी निवडणूक ही मान्यताप्राप्त पक्षांच्या चिन्हांवरच घेण्यात यावी अशी मागणी भिंगार मधील भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संपुर्ण देशात कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका 2007 पासून पक्ष चिन्हांवर घेण्यात येत आहेत. कँटोन्मेंट बोर्डाचा कायद्यात तसा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे सन 2020 मध्ये होणारी अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डाची सार्वत्रिक निवडणूक पक्षचिन्हावरच घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

तसेच कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून घरपट्टी व पाणीपट्टी वाढविण्यात आलेली आहे. ती रद्द करुन जुन्या दरानेच घरपट्टी व पाणीपट्टी घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपाचे भिंगार शहराध्यक्ष शिवाजी दहिहंडे, चिटणीस वसंत राठोड, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किशोर पटोरे, उपाध्यक्ष सुरेश तनपुरे, कँटोन्मेंट बोर्ड सदस्या शुभांगी साठे, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्सना मुंगी, गणेश साठे, अजय देवकुळे, अंबादास धरमसिंग, सचिन दळवी, अनंत रासणे, कैलास गव्हाणे, संतोष हजारे आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post