समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोघा संशयितांना अटक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – मंगळवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास दोघांना शहरात संशयितरित्या फिरताना गस्त घालणार्या पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही चोरी किंवा इतर काही उद्देशाने शहरात संशयितरित्या फिरत असल्याची शंका पोलिसांना आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकातील पोलिस हे रात्री शहरात पेट्रोलिंग करीत असताना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नविन टिळक रोडवर पहाटे 2.20 च्या सुमारास नंदनवन हॉटेलच्या बाजुला अंधारात संशयितरित्या वावरताना 34 वर्षीय युवक आढळुन आला. पोलिसांनी त्यास हटकुन नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल लक्ष्मण खरात (मु.पो. खडके, ता. राहुरी, हल्ली रा. गोळीबार फाटा, नांदुर रोड, राहुरी) असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गिलवरीचे व्ही आकाराचे लाकुड आढळुन आले.
तर दुसर्या घटनेत नगर-पुणे रोडवरील विनायक नगरकडे जाणार्या रोडवर जॉन डियर ट्रॅक्टर शोरूमच्या बाजुला अंधारात संशयितरित्या फिरणारा 25 वर्षीय युवक आढळुन आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संतोष उर्फ सोपान माणिकराव भिंगारदिवे (रा. चेमटे मळा, बुर्हाणनगर) असे सांगितले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 7 वेगवेगळ्या लहानमोठ्या मोटारसायकलच्या चाव्या आढळुन आल्या. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 122 प्रमाणे नोंद केली आहे.

Post a Comment