नागरिकत्व सुधारणा कायदाबाबत जिल्ह्यात जनजागरण अभियान – माजी खा. दिलीप गांधी


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 च्या निमित्ताने जिल्हाभर जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने संपर्क अभियान, संवाद अभियान, संवाद कार्यक्रम, सामाजिक संपर्क कार्यक्रम, सोशल मिडिया, प्रसारमाध्यमे, मिरवणुका व नागरिकत्व सहायता या माध्यमातून जनजागरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी खा. दिलीप गांधी यांनी दिली आहे.

या जनजागरण अभियानात संपर्क अभियान अंतर्गत देशात 3 कोटी व महाराष्ट्रात 30 लाख परिवारांशी संपर्क करून पंतप्रधानांना राज्यातील 10 लाख धन्यवाद पत्रे (पत्र, ई-मेल, पोस्टकार्ड इ.) पाठविण्यात येणार आहे. या कामासाठी राज्यातील 1 लाख कार्यकर्त्यांना संघटीत करणार आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांशी 30 डिसेंबरपर्यंत संवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशमधील अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अन्यायाला न्याय मिळणेकामी 30 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातून या कायद्याचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांकडून 10 लाख ट्वीट करण्यात येणार आहे.

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी नगर शहरातून नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 च्या समर्थनार्थ बुधवारी (दि.25) सकाळी 10 वाजता गांधी मैदान येथून रॅली काढण्यात येईल. सदर रॅलीचा मार्ग गांधी मैदान – पटवर्धन चौक-चौपाटी कारंजा – चितळे रोड – नेता सुभाष चौक – नवीपेठ – अर्बन बँक रोड – कापडबाजार-तेलीखुंट – दाळमंडई – आडतेबाजार – बन्सी महाराज रोड – जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होईल.

तरी आपण सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देशाच्या भवितव्यासाठी तसेच एक दिवस आपल्या देशाच्या एकता, अखंडतेसाठी व सुरक्षेसाठी म्हणून या जनजागरण अभियानात व दिनांक 25 डिसेंबरच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी व शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post