ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना अहमदनगर प्रेस क्लबचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर


राहुल द्वीवेदी, जगन्नाथ भोर, प्रदीप गांधी, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. राजेश भनगडे यांच्यासह झेडपीच्या खांडके शाळेचाही होणार गौरव | २३ पत्रकारांचा ‘बेस्ट रिपोर्टर’ पुरस्काराने सन्मान

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर
- नगर शहरातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘अहमदनगर प्रेस क्लब’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी (उत्कृष्ट प्रशासन प्रमुख), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ थोर (उत्कृष्ट प्रशासन अधिकारी), कोहीनूर वस्त्रदालनाचे प्रदिपशेठ गांधी (आदर्श व्यावसायिक), नोबेल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), ढवळपुरीचे (पारनेर) सरपंच डॉ. राजेश भनगडे (आदर्श कृतीशील सरपंच) व जिल्हा परिषदेच्या खांडके (ता. नगर) येथील शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच विविध दैनिकांच्या २३ पत्रकारांना अहमदनगर प्रेस क्लबचा ‘बेस्ट रिपोर्टर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली.

अहमदनगर प्रेस क्लब या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सध्या चालू आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व त्यानिमित्ताने आयोजित केल्या जाणार्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, सामाजिक उत्तरदायित्व जपणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या जोडीने पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणार्या विविध दैनिकांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते ‘बेस्ट रिपोर्टर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र झोंड व अरुण वाघमोडे यांनी दिली.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने दि. ६ जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमात वर्षभरात विविध पुरस्कार प्रात केलेल्या पत्रकार पुरस्कारार्थीचा गौरव केला जाणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे सचिव मुरलीधर कराळे, सहसचिव दीपक कांबळे यांनी दिली. प्रेस क्लबचे सदस्य असलेल्या पत्रकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्षाची भेट म्हणून या विमा पॉलिसीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती खजिनदार ज्ञानेश दुधाडे यांनी दिली.

रौप्य महोत्सवी समारंभात मान्यवरांच्या हस्ते ‘बेस्ट रिपोर्टर’ हा पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार असून, हा पुरस्कार पुढील पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. दीपक रोकडे (सकाळ), अण्णासाहेब नवथर (लोकमत), समीर दाणी (पुण्य नगरी), दीपक कांबळे (दिव्य मराठी), मयुर मेहता (पुढारी), अशोक परुडे (महाराष्ट्र टाईम्स), बद्रीनारायण वडणे (सार्वमत), रवी कदम (प्रभात), मोहिनीराज लहाडे (लोकसत्ता), मिलिंद देखने (सामना), दिलीप वाघमारे (केसरी), ललित गुंदेचा (नवा मराठा), भाऊसाहेब होळकर (समाचार), सुनील चोभे (नगर सह्याद्री), संदीप रोडे (नगर टाईम्स), अंबरीश धर्माधिकारी (अहमदनगर घडामोडी), सुभाष मुदळ (नगर स्वतंत्र), प्रशांत पाटोळे (मराठवाडा केसरी), निशांत दातीर (नवाकाळ), अशोक सोनवणे (लोकमंथन) अनिल शहा (प्रेस फोटोग्राफर), सुशिल थोरात (जय महाराष्ट्र, न्यूज चॅनेल), अमीर सय्यद (ए.टीव्ही, लोकल न्यूज चॅनेल). याशिवाय रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही निवडक मान्यवर ज्येष्ठ पत्रकारांचाही विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post