महापालिकेची राज्यात पुनरावृत्ती
माय नगर वेब टीम
अहमदनगर – नगर महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत महापौर पदाची खुर्ची पटकाविल्याच्या इतिहासाची पुनर्रावृत्ती राज्यात झाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. नगरच्या राजकारणाची पुनर्रावृत्ती झाल्याची चर्चा सगळीकडे व्हायरल झाली.
नगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक 24 जागा जिंकून शिवसेना नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपने 14 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी पक्षाने 18 तर काँग्रेसने केवळ पाच जागा जिंकल्या. भाजप-सेनेची युती होऊन शिवसेनेचा महापौर होईल असे सर्वानाच वाटत होते. पण भाजपने सत्तेची चाल खेळत शिवसेनेला सत्तेपासून अलगद दूर ठेवले. राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत भाजपने महापालिकेतील महापौर पदाची खुर्ची पटकाविली. तत्कालीन खासदार दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हा निर्णय घेतला होता. महापालिकेत भाजप सत्तेवर गेली तरी राष्ट्रवादी मात्र सत्तेत सहभागी झाली नाही. राज्यात मात्र राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
भाजपने नगरमध्ये जे केले तेच राज्याच्या राजकारणात पहावयास मिळाले. भाजपने अत्यंत गुप्तता पाळत राष्ट्रवादीला सुरूंग लावत अजित पवार यांना गळाला लावले. अजित पवार हे विधीमंडळ पक्षनेते असल्याने सगळ्या 54 आमदारांचे पत्र राज्यपालांकडके सादर केले. त्यामुळेच भाजपचे सरकार राज्यात स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला.
नगरमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यभर गदारोळ झाला. आ. जगताप यांनी सगळी जबाबदारी घेतली तरीही प्रा. माणिकराव विधाते यांच्यासह पाठिंबा देणार्या सगळ्याच 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात आली. राज्यातही असंच घडताना दिसतं. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित होते. मात्र ते सगळेच आमदार पुन्हा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी आमदारांवर कारवाई करते काय याकडे नगरसह राज्याचे लक्ष लागून आहे.
Post a Comment