राजकीय सत्तानाट्य : महाराष्ट्राच्या पदरात काय पडणार ?



माय नगर वेब टीम
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सगळ्यांना धक्का दिला. यात मोठी भर होती ती म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्याची. राजकीय गणिते कशी जुळतात आणि कशी बिघडतात याचेच हे ज्वलंत उदाहरण.

महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना युतीचे सर्वात जास्त आमदार निवडून देऊन एका अर्थाने युतीला पसंती दिली होती. युती करून हे दोन्ही पक्ष जनतेसमोर मते मागायला आले होते. मात्र निकाल लागताच त्यांच्यात फारकत झाली. ‘मी पुन्हा येईन’, ‘फिप्टी फिप्टी’ या मुद्यांवरून दोघेही विभक्त झाले. मग जुळवाजुळव सुरू झाली ती विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांसोबत जाण्याची. याच्यातून कोणी चाणक्यची भूमिका करत होते तर कुणी लगाम ओढण्याची.

या सगळ्या रस्सीखेचेत आणि सत्तेचा अंतिम टप्पा गाठला जाईपर्यंत वेगळेच चित्र उभे राहिले. याला कुणी खंजीर खुपसला असे म्हणतात, तर कुणी चाणक्यनीती असे म्हणतात. कुणी त्याला ईडीची भीती म्हणतात, तर कुणी म्हणतेय राष्ट्रपतिपदाचे गाजर. कुणी काहीही म्हणो, कुणाच्या पदरात काय पडणार यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या पदरात काय पडणार? पुरोगामी प्रगत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागावी हीच मोठी खेदाची बाब. यापूर्वी ती लागली आहे पण आज ज्या पद्धतीने देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राकडे बघितले जाते त्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण चालावे हेसुद्धा खेदजनक.

प्रगत महाराष्ट्रात अजूनही खेड्यापाड्यांमध्ये रस्त्याचे, पाण्याचे, शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न ज्वलंत आहेत. आजही तरुणांना बेरोजगारीसारखा मोठा प्रश्न भेडसावतोय. औद्योगिकरणाला अधोगती लागली आहे. हे सगळे मुद्दे समोर ठेवूनच जनतेने या निवडणुकीमध्ये अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. गेले महिनाभर जे नाटक रंगले ते बघून या प्रश्नांचा कोणाला तरी बोध होत होता का? असेच वाटत राहील. निवडणूक आणि लोकप्रतिनिधी विधानसभेवर पाठवणे म्हणजे समाजाने स्वत:च्या मतांचे, विचारांचे दाखवलेले प्रतिबिंबच.

या प्रतिबिंबाची जाणीव कुठल्याही पक्षाने ठेऊ नये यापेक्षा काय वाईट असू शकते? यालाच लोकशाही म्हणावे का, असाही प्रश्न पडतो. राजकारणाचे डावपेच करत कोण जिंकले, कोण हरले याचे मोजमाप करण्यापेक्षा आपला महाराष्ट्र तर हरत नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता सुरू होईल धांदल ती शक्तिप्रदर्शनाची. कोणाकडे किती आमदार, कोण फुटला, कोण कुठे गेला याकडे लक्ष. ते स्थिर होणार नाही तोच विरोधी पक्ष हे अशा अनोख्या युतीचे सरकार चालू देतील का, असाही प्रश्न. महाराष्ट्राचा इतर राज्यांसारखा विचका होऊ नये व राज्यकर्त्यांनी राज्याकडे, तेथील जनतेकडे व त्यांनी वचननाम्यात दिलेल्या वचनांकडे लक्ष दिले तर खरे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post