अहमदनगर - नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यात दुरंगी सामना रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. विजयाचे गणित आखण्यासाठी शिवसैनिकांनी बाण ताणला आहे. तर जगताप समर्थकांनी घड्याळाची टिकटिक वाढवली आहे. जगताप-राठोड समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडले आहेत.
असे असले तरी वंचित, बसप, भाकप आणि एमआयएम किती मते घेतात, भाजपाचे नाराज राठोडांचे काम करणार का? कळमकर जगतापांना दिलसे साथ देणार का? यावर निकालाचे गणित अवलंबून असणार आहे. नगरकर या निवडणुकीत कोणाला 'गाशा' गुंडाळायला लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून त्यासाठी 24 तारखेची वाट पहावी लागणार आहे.
सलग 25 वर्षे आमदार राहण्याची राठोड यांची सद्दी मागील निवडणुकीत आ. संग्राम जगताप यांनी संपुष्टात आणली. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यामुळे राठोड यांचे मोठे नुकसान झाले. या निवडणुकीत युती झाली, हे राठोड यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरुवातीचा काही काळ सोडला तर पुन्हा राठोड संपर्क मोहिमेवर निघाले. त्याचा फायदा त्यांना महापालिका निवडणुकीत झाला. या निवडणुकीतही भाजप स्वतंत्र लढला. शिवाय राष्ट्रवादी आणि भाजपने शिवसेनेला एकाकी पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. असे असतानाही सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून राठोड यांनी बाजी मारली. त्यानंतर महापालिकेच्या सत्तेपासून त्यांना दूर ठेवण्यात आले.
या मतदारसंघात निवडणुकीमध्ये महापालिकेच्या कारभारावरच जास्त चर्चा होत असते. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित सत्ता आहे. या सत्तेचा फायदा होणार की तोटा, हे काळच ठरवेल. मात्र महापालिकेत शिवसेनेला बाजूला ठेवलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच प्रचार करावा लागणार आहे. त्यासाठी मनोमीलनाच्या खटपटी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. माजी खासदार दिलीप गांधी आणि त्यांना मानणारे समर्थक असा भाजपचा मोठा गट राठोड यांच्या विरोधात आणि आ. जगताप यांच्याशी जवळीक असलेला आहे.
गांधी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. अर्बन बँकेतील कारभारामुळे ते वादग्रस्त ठरले आहेत. शिवाय लोकसभा निवड़णुकीत उमेदवारी कापताना त्यांना पक्षाने काही शब्द दिले आहेत. अर्बन बँकेतील कटकट जास्त वाढू नये म्हणून राठोड यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावे लागेल, असे बोलले जाते. तसेच पक्षाचा आदेशही पाळावा लागेल. असे असले तरी ते, त्यांचे समर्थक आणि महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे नगरसेवक हे राठोड यांचे मन लावून काम करतील का, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
दुसरीकडे आमदार जगताप यांना राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा विरोध असल्याचे समजते. कळमकर यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. त्यांना प्रचारात सक्रीय करणे जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. माजी महापौर कळमकर वेगळा विचार करण्याच्या भूमिकेत आहेत. तसे झाल्यास आ. जगताप यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आमदार जगताप यांच्यासाठी सक्रीय झाले असून, ही मात्र त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
Post a Comment