गोंधळानंतर शिक्षक बँकेची दोन सत्रांत सहा तास सभा



माय नगर वेब टीम
अहमदनगर  – जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची शंभराव्या सभेची सुरूवात गोंधळात झाली. सभेच्या कामकाजात पोलिसांचा हस्तक्षेप, विकास मंडळाच्या जागेत वास्तू उभारणीसाठी ठेवी वर्ग करण्यास विरोध आणि विकास डावखरे यांच्या भाषणादरम्यान, विरोधकांसह तांबे गट आक्रमक झाल्याने काही काळ गोंधळ झाला. पण त्यानंतर दोन सत्रांत सुमारे सहा तासांपेक्षा अधिक काळ सभा झाली. यंदाच्या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी तांबे गटाने सभेवरचे नियंत्रण सुटून दिले नाही. सभेत विरोधकांसह प्रत्येक नेत्याला आणि इच्छुक सभासदाला मत मांडण्याची संधी देण्यात आली.

गुरूमाउली मंडळातील तांबे गटाचे अध्यक्ष साहेबराव अनाप यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नगरमध्ये शिक्षक बँकेची 100 वी ऐतिहासिक सर्वसाधारण सभा झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच सभास्थळ पोलिसांच्या नियंत्रणात होते. यामुळे गोंधळी शिक्षक आधीच सावध होते. सभा सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी गुरूमाऊली गटातील तांबे गटाचे 11 आणि रोहकले गटाच्या 9 अशा 20 संचालकांनी एकत्रित फोटोसेशन केले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सभेला सुरूवात झाली. यावेळी रोहकले गटाचे संचालक व्यासपिठाच्या खाली होते. त्यांना व्यासपिठावर येण्याचे आवाहन केल्यानंतर ते व्यासपिठावर आले.
अध्यक्ष अनाप यांनी प्रस्ताविक केले. यात शिक्षक सभासदांच्या आशिर्वादामुळे सामान्य शिक्षकाला बँकेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. बँकेत यापुढे सभासद हिताचे निर्णय घेण्यात येतील, विरोधकांसह, शिक्षक सभासदांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे दिली जातील, तोपर्यंत सभा संपविण्यात येणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. त्यांचे भाषण संपताच शिक्षक नेते संजय धामणे यांनी आधी पोलिसांना व्यासपिठाजवळून हटवा अशी मागणी केली. यावरून काहीकाळ गोंधळ झाला. अखेर पोलिसांनी माईकचा ताबा घेत सभा शांततेत पार पाडण्याची सुचना केली. संचालक अर्जुन शिरसाठ यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post