माजी कायदामंत्री, नामवंत वकील राम जेठमलानी यांचं निधन
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -
ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली.जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रातांतील शिखरापूर येथे १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली. फाळणी होईपर्यंत जेठमलानी यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली. १९५९ मध्ये लढलेल्या के.एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याने जेठमलानी यांचं नाव चर्चेत आले. हा खटला त्यांच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा खटला होता. त्यानंतर २०११ मध्ये राम जेठमलानी यांनी राजीव गांधी हत्येतील आरोपींची बाजू मद्रास उच्च न्यायालयात मांडली होती. याबरोबर इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींची बाजू त्यांनी मांडली होती.
स्टॉक मार्केट घोटाळ्यातील हर्षद मेहता व केतन पारेख यांचे वकिली त्यांनी केली होती. जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी अफझल गुरू तसेच गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचा खटला लढवला होता. जेसिका लाल खून प्रकरणात मनू शर्मा यांची बाजू जेठमलानी मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदीही जेठमलानी यांची २०१०मध्ये निवड करण्यात आली होती.
जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment