राज ठाकरे कडाडले ; म्हणाले गडकिल्ल्यांना हात लावाल तर ....
माय नगर वेब टीम
मुंबई : राज्य सरकारच्या ऐतिहासिक स्थळासंदर्भातल्या पर्यटन धोरणावरून जोरदार राजकीय रणकंदन सुरु आहे. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतली आहे. सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशा शब्दात राज ठाकरेंनी गड-किल्ले धोरणाचा समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले.
राज म्हणाले की, राज्यातल्या गड किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करू नका. तसे केल्यास महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे.
लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातले गडकिल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती. त्यानंतर राज्याच्या पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले की, राज्यात एक वर्ग 1 दुसरे वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात. वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात.
केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल, असे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
Post a Comment