कर्जत-जामखेड मतदारसंघात बसेना जुन्या-नव्याचा ताळमेळ




माय नगर वेब टीम
जामखेड – विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपपुढे कडवे अव्हान उभे करणार असल्याचे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या नेते सांगत असले, तरी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मात्र जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला या भागाचे आमदार तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी अधिक मजबूत करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षाच्या मंत्रीपदाच्या माध्यमांतून जोरदार प्रयत्न केले. राम शिंदे यांनी मजबूत केलेला बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न बघणारी राष्ट्रवादी भाजपविरोधी वातावरण निर्मिती करण्यात सध्यातरी बॅकफूटवरच असल्याचे दिसत आहे. बूथबांधणीपासून ते कार्यकर्ते व नेते यांच्या मनोमीलनात राष्ट्रवादीला मोठे यश येताना दिसत नाही. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला निष्ठावंतांसह जुन्या नव्यांचा योग्य ताळमेळ ठेवण्याबरोबरच तरुणांना आकर्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागण्याची गरज आहे.

भाजपकडे कार्यकर्त्यांचे तगडे जाळे असून ती भाजपची जमेची बाजू आहे. राम शिंदे यांच्या विजयात हेच कार्यकर्ते ताकदीने यापूर्वी काम करताना दिसत होते. यावेळीही भाजपमधील प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी राम शिंदे यांच्या विजयासाठी कामाला लागली आहे. भाजपमध्ये वाद असले तरी नाराजांची निष्ठा राम शिंदे यांच्याप्रती असल्याने नाराज कार्यकर्ते राम शिंदेंसाठी पक्षातील बेबनाव जाहीर न करता मोर्चेबांधणी करताना मतदारसंघात दिसू लागले आहेत.त्या उलट स्थिती राष्ट्रवादीमध्ये आहे. नेते आल्यानंतर कार्यकर्ते एका व्यासपीठावर दिसत असले तरी नेत्यांनी पाठ फिरवताच सुंदोपसुंदीला सुरुवात होते.

 गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात पाय रुजविलेल्या भाजपला शह देण्यासाठी कार्यकर्त्यांतील ही बेकी अगोदर दूर करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर असेल.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post