महापालिकेच्या चुकीमुळे दोन वर्षपासून करमणूक कर थकित




माय नगर वेब टीम
अहमदनगर – महापालिका कार्यक्षेत्रातील करमणूक कर जमा करण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही गेल्या दोन वर्षांपासून हा कर जमा केलाच नसल्याचे मंगळवारी झालेल्या सभेत उघड झाले. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नगरसेवक शाम नळकांडे यांनी निदर्शनास आणून देताच आयुक्तांसह संबंधित अधिकार्‍यांनी सर्व कर थकबाकीसह वसूल करण्यात येईल, असे उत्तर देत वेळ मारून नेली.
महापालिका कार्यक्षेत्रातील चित्रपटगृह, व्हिडिओ हॉल, संगणकावरील विविध गेमचे पार्लर, केबल आदी ठिकाणचा करमणूक कर यापूर्वी जिल्हा प्रशासन जमा करत असत. मात्र महापालिका स्थापन झाल्यानंतर हा कर जमा करण्याची जबाबदारी महापालिकेची असते. जमा झालेले कर महापालिकेला स्वउत्पन्न म्हणून वापरता येते. 29 मे 2017 पासून या कराच्या वसुलीचे काम जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर करमणूक कर वसुलीसाठी महापालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. कालांतराने शहर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी असलेले अंबादास सोनवणे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. दैनंदिन कामातून त्यांनाही या कामाकडे पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही.
त्यामुळे त्यांनीही याबाबतची कोणतीही माहिती संकलित केली नाही. करमणुकीसाठी विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक तिकीटामागे अठरा टक्के कर महापालिकेला उपलब्ध होतो. मात्र गेल्या दोन वर्षात याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नगरसेवक शाम नळकांडे यांनी सभेत हा विषय उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला. केवळ जाब विचारून ते थांबले नाहीत, तर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍याकडून कोट्यवधींचा कर वसूल करावा आणि संबंधितांवर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post