माय नगर वेब टीम
अहमदनगर
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी राज्यात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेवून निवडून येईल अशी पैज लावली होती. तसेच राज्यातील पहिल्या तीन नंबरमध्ये मताधिक्य असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, त्यांचा राज्यात चौथा क्रमांक लागला आहे.
लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदासंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची लढत राज्यात लक्षवेधी ठरली. नगर दक्षिण मतदारसंघाचा निकाल हाती आला असून सुमारे पावणे तीन लाख मतांच्या फरकाने डॉ. सुजय विखे पाटील यांनी विजय मिळविला आहे.
राज्यात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य उत्तर मुंबई मतदारसंघातील गोपाळ शेट्टी यांना मिळाले आहे. त्यांना तब्बल साडेचार लाखांचे मताधिक्य आहे. दुसर्या क्रमांकावर जळगाव मतदारसंघातील उन्मेष पाटील आहेत. त्यांना सुमारे चार लाखांचे मताधिक्य आहे. तिसर्या क्रमांकावर रावेर मतदार संघातील रक्षा खडसे आहेत. त्यांना तीन लाख 30 हजारांचे मताधिक्य आहे. तर चौथ्या क्रमांकावर अहमदनगर दक्षिण मतदार संघातील डॉ. सुजय विखे पाटील आहेत. त्यांना सुमारे पावणे तीन लाखांचे मताधिक्य आहे.
दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील यांना मिळालेले प्रचंड मताधिक्य यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच दणदणीत विजयाने भाजपात विखे पाटील परिवाराचे वजन वाढले असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment