छावण्यातील जनावरांच्या अनुदानात सरकारकडून वाढ



माय नगर वेब टीम

मुंबई : चारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून प्रति जनावर आता 90 रुपयांऐवजी 100 रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. अनुदान वाढीमुळे छावणी चालकांना दिलासा मिळाला आहे.

चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणाची खरेदी व त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस 18 किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस 1 किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी 9 किलो हिरवा चारा व लहान जनावरांसाठी 1 किलो पशुखाद्य देण्यात येत असल्यामुळे चारा छावण्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये प्रति जनावर 10 रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी 100 रुपये तर लहान जनावरांसाठी 50 रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दुष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी, पाणी पुरवठा, रोहयो आदींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, पदुम मंत्री महादेव जानकर आदी यावेळी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post