माय नगर वेब टीम
मुंबई : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केले आहे. खरातने महिलांना तीर्थाच्या नावाखाली मुत्र पाजले, अशी खळबळजनक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. या प्रकरणी एकूण आठ गुन्हे दाखल असून, खरातला ज्यांनी मदत केली आहे त्या कुणालाही सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणात आणखी सखोल तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरावे मिळेल त्या सर्वांची चौकशी करू
तसेच ज्या ज्या व्यक्तीविरोधात पुरावे मिळेल त्या सर्वांची चौकशी करू. आपण सर्व राजकारणात आहोत. कुणाचा फोटो कुणासोबत येतो हे पाहिलं आहे. फक्त कुणाचा फोटो कुणासोबत आहे यावरून कुणालाही आरोपी करता येत नाही. पण खरातच्या मोबाईलमधील डीलिटेड डेटाही काढत आहोत. त्यात कुणाचा संपर्क होता का? कुणी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केला का? मेसेज केले का याची चौकशी केली जाईल.
नीरज जाधवने एआय फोटो व्हायरल केला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहीती दिली की, खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 18 फेब्रुवारी रोजी नीरज जाधवने एआय फोटो व्हायरल केला आणि नंतर डिलीट केला.
त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीचा तपास सुरू आहे. तसेच, सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली.
महिलेला गुंगीचे औषध देऊन..
या महिलेला गुंगीचे औषध देऊन, तिच्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देत खरातने तिच्यावर वारंवार आत्याचार केला. खरात हा महिलांना संमोहित करायचा आणि अयोग्य ठिकाणी स्पर्श करायचा. तीर्थाच्या नावाखाली त्यांना मुत्र पाजायचा.
याची वाच्यता केल्यास दैवी कोप होईल
आपण दैवी अवतार असल्याचे सांगत याची वाच्यता केल्यास दैवी कोप होईल अशी धमकी द्यायचा. या तपासात 6 लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. त्यानुसार 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली आहे.
तसेच, पिडीत महिलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट करण्याचे काम सुरू आहे. खरातची 33 एकर जमीन, फार्म हाऊस, आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेल येथील 40 गुंठे जमीन, मुलीच्या नावावर असलेला पुण्यातील फ्लॅट, सिन्नर येथे मंगल कार्यालय जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. आरोपीच्या शिवनिका संस्थानची चौकशी करण्यात येत आहे, असे फडणवीस म्हणाले.
पोलीस कोठडीत पाच दिवसाची वाढ
खरातला आज नाशिक सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातची आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंतच्या तपासाबाबत पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. तसेच, पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment