खड्ड्यांवर डांबराऐवजी मातीचा मुलामा! ; बाबुर्डी बेंद-वाळकी रस्त्यावरील धक्कादायक प्रकार; संतप्त ग्रामस्थांचा रस्तारोकोचा इशारा



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद ते वाळकी हा महत्त्वाचा रस्ता पहिल्याच पावसात अक्षरशः उखडून निघाला असून प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी डांबराऐवजी मातीमिश्रित मुरूम टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी आदी गावांतील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी वाळकी येथे ये-जा करतात. मात्र, रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक तसेच सुपा, वाळवणे, असतगाव, सारोळा कासार आणि दौंड रोडकडून येणारे प्रवासीही सोलापूर महामार्गाकडे प्रवास करतात.



 वाळकी ते बाबुर्डी बेंद शिवरस्त्यापर्यंतचे काम अद्याप अपूर्ण असून संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सामाजिक कार्यकर्ते लहू कासार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे माती टाकून बुजवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. "ही केवळ मलमपट्टी असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, लहू कासार, आबासाहेब चोभे, महादेव चोभे, संदीप चोभे, सार्थक चोभे, सोपान चोभे, कैलास चोभे, विकास कासार, आकाश कासार, गुलाब चोभे, तेजस चोभे, भाऊसाहेब नागवे, राम साळवे आणि अनिल चोभे यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. "आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू झाले नाही आणि खड्ड्यांची योग्य दुरुस्ती झाली नाही, तर नगर-दौंड महामार्गावर तीव्र रस्तारोको आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला आहे.

खड्ड्यांवर माती टाकून प्रशासन नेमकं कोणाची दिशाभूल करत आहे? नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबणार कधी?, असा सवाल आता संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post