‘महाराष्ट्रात १६ हजार कोटींची गुंतवणूक’


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दीर्घ मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा दुसरा भाग आज (दि. २६) प्रसारित झाला. या दुसऱ्या भागात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे त्यामुळे देशही डळमळीत होईल का असा प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळं काही संपलय किंवा संपणार आहे, असे मानण्याचे कारण नाही असे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. या भागात संजय राऊतांनी राजकीय प्रश्नांबरोबरच कोरोनामुळे डळमळीत झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबतही प्रश्न विचारले. संजय राऊतांनी 'कोट्यवधी लोकांना रोजगार देणारे हे राज्य. या राज्याचीच अर्थव्यवस्था डळमळीत झाली तर देशही डळमळीत होईल..' असा प्रश्न विचारला.



त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मागे मी म्हटल्याप्रामाणे पंतप्रधान मोदी हे अधूनमधून देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधत असतात. त्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या संवादातच तुम्ही कोणतीही अशी घोषणा करू नका की भविष्यात आपल्याला त्याची अडचण निर्माण होईल. सवंग लोकप्रीयतेसाठी उगाच सुट दिली, माफी दिली असं जाहीर करू नका. जशी तुमची आर्थिक परिस्थिती कठिण आहे तशीच केंद्राचीही आर्थिक परिस्थिती कठिण आहे. हे सत्यच आहे की ही जागतिक अडचण आहे, असे सांगत फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण जगाचीच अवस्था बिकट आहे. याच्याकडे लक्ष वेधले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले ते म्हणाले की, आपण मध्यंतरी काही करार केले आहेत. जागतिक दर्जाच्या मोठ्या कंपन्यांसोबत एमओयु केलेत. त्यानुसार महाराष्ट्रात १६ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. संपूर्ण देशात रिव्हर्स गिअर टाकल्यासारखी परिस्थिती आहे. पण आपल्याकडे गुंतवणूक येत आहे. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की, सगळ संपलय सगळ संपणार आहे, असे मानण्याची गरज नाही. हा काळ आणीबाणीचा, अटीतटीचा आहे हा काळ काढणं गरजेचे आहे. एकमेकांना सावरणं गरजेचं आहे. आपण प्रयत्न करत आहोत. उद्योग धंदे पुन्हा सुरू करत आहोत. काही ठिकाणी तर ५० हजारांच्या वर उद्योग धंदे सुरू झाले आहेत. मुंबई आणि पुणे हा औद्योगिक पट्टा आहे त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे लॉकडाऊन आहे. पण, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये आपण उद्योगधंदे सुरू करायला मुभा दिली आहे.'

दरम्यान, संजय राऊतांनी सरकारी पातळीवरील काम ठप्प आहे असे चित्र दिसत आहे खरं आहे का? असे विचाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'हे पूर्णपणे खरं नाही. सरकारी कामेही सुरू आहेत. रस्ता, धरणे कोस्टल रोडची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील काही प्रकल्प असतील, कापूस खरेदी असेल हे सुरू आहे. दूध खरेदी सुरू आहे. मक्याची खरेदी करतोय. ज्यांच बियाण बोगस निघालं त्यांना आपण नुकसानभरपाई देतोय. आपण हे सगळं करतोय. एक लक्षात घेतले पाहिजे की संकट आले आहे म्हणून आम्ही हातावर हात धरून बसलेलो नाही. आपण साधारणपणे १६ हजार कोटींचा एमओयू साईन केला आहे. एमओयु ही प्राथमिक अवस्था आहे. त्याच्या पुढची बोलणी सुरू आहे. अजून काही एमओयु होणार आहेत.' असे सांगितले.

उद्धव ठाकरेंना एमओयुवर किती विश्वास ठेवता? याआधीच्या सरकारने किती एमओयु साईन केले पण, गुंतवणूक आली नाही. असे विचारल्यावर त्यांनी 'सरकारची भूमिका महत्वाची असते. त्या काळात एमओयु झाले आणि नोटबंदी आली त्यामुळे एक अनिश्चितता निर्माण झाली. अशी अनिश्चितता असेल तर गुंतवणूक येणार नाही. आता राज्यापुरते बोलायचे झाले तर धोरणांमध्ये अनिश्चितता नाही. आपण याही काळात काही गोष्टी करत आहोत. जमिन अधिगृहणाचे सोपीकरण आणि इज ऑफ डुइंग बिझनेस या सगळ्या गोष्टी करतोय. एमओयु आमलात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार त्याबाबत अनुकूल वातावरण तयार करत आहे. त्यातून गुंतवणूक नक्की येईल.' असा विश्वास व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post