भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात ; कनिष्ठ अभियंत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप



सर्व संपत्तीची विभागीय चौकशी व्हावी

कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर – जिल्हा परिषद, अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता  यांच्यावर बिले मंजूर करताना अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. नुकतेच लाच घेताना गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या कामांची सखोल चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता तथा अतिरिक्त पदभार उपअभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने दि. २३ मार्च  रोजी मौजे देहरे येथील दत्त मंदिर स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या ८ लाख २२ हजार २०६ रुपयांच्या कामाचे बिल मंजूर केले. या बिलाच्या मंजुरीसाठी त्यांनी संबंधित ठेकेदार यांच्याकडे एकूण रकमेच्या २ टक्के, म्हणजेच सुमारे १६ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

तसेच संबंधित कामामध्ये काही त्रुटी असतानाही जाणीवपूर्वक बिल मंजुरीसाठी विलंब करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, अनेक गावांमधील कामांमध्ये त्रुटी असतानाही बिले मंजूर करण्यात आली असून, शासनाच्या नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ गोळा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती शासनाकडे सादर करणे बंधनकारक असताना, सदर अधिकाऱ्याने  मालमत्ता, खरेदी किंवा गुंतवणुकीबाबत आवश्यक माहिती सादर केली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या सर्व कामांची शासन परिपत्रकानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विभागीय स्तरावर सखोल चौकशी करावी. तसेच त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची उघड तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे.

दरम्यान, येत्या एका महिन्यात यासंदर्भात ठोस कारवाई न झाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता ६,५०० रुपयांची लाच घेताना जाळ्यात

​जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता सचिन सुरेश दिनकर याला ६,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिनकर याने लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी प्रवीण प्रकाश शिरसाट हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी मौजे देहरे येथील दत्त मंदिर स्मशानभूमी सुशोभीकरणाचे ८ लाख २२ हजार २०६ रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंता सचिन सुरेश दिनकर याने एकूण बिलाच्या २ टक्के म्हणजेच १६,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १०,००० रुपये तक्रारदाराने यापूर्वीच दिले होते. उर्वरित ६,५०० रुपयांसाठी दिनकर याने वारंवार तगादा लावला होता. पैसे दिल्याशिवाय बिल पुढे पाठवणार नाही, अशी भूमिका त्याने घेतल्याने शिरसाट यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

​पोलीस उपअधीक्षक अजित बाळकृष्ण त्रिकुटे यांच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. २३ मार्च रोजी सायंकाळी दिल्ली गेट आणि न्यू ला कॉलेज समोर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी सचिन सुरेश दिनकर याने तक्रारदाराकडून उर्वरित लाचेची रक्कम ६,५०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सरकारी पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली असून, स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवल्याबद्दल दिनकर याला ताब्यात घेण्यात आले.

​या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अजित बाळकृष्ण त्रिकुटे, पोलीस अंमलदार बिंदे, निमसे, कराड आणि हारूण बेग यांचा समावेश होता. शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरुद्ध ही कडक कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हा भाजप पदाधिकारी याचा भाऊ असल्याचे समजते. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post