नवी दिल्ली :
दिल्लीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर एकच्या बाहेर असलेल्या एका सिग्नलवर हा स्फोट घडला आहे. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि आयबी चीफसोबत बातचित केली आहे. यानंतर अमित शाह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह स्वत: घटनास्थळी जात आहेत. तसेच या घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी अमित शाह लोकनायक रुग्णालयाला दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून जखमींची विचारपूस केली जात आहे. अमित शाह यांनी डॉक्टरांकडूनही आढावा घेतला आहे.
अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया काय?
"दिल्लीत लाल किल्ला परिसरात एका ट्रफीक सिग्नलवर I-20 ह्युंदायी गाडीत स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे आजुबाजूच्या गाड्यांमधील प्रवासी आणि रस्त्याने जाणारे काही नागरीक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक सूचनेनुसार, काही जणांचा या घटनेत मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच दहा मिनिटांत दिल्ली क्राईम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली. NSA आणि NIA च्या टीमने तपास करायला सुरुवात केली आहे", अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
"घटनेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व गोष्टींसाठी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. माझी दिल्ली पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. तसेच स्पेशल ब्रांचच्या इंचर्जासोबतही चर्चा झाली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचचे इंचार्ज घटनास्थळी दाखल झाले आहेत. आम्ही सर्व शक्यतांच्या दृष्टीकोनातून तपास करत आहोत. सर्व शक्यता लक्षात घेऊन तातडीने तपास होत आहे. या प्रकरणी तपास करुन लवकर जनतेसमोर सविस्तर माहिती दिली जाईल. मी स्वत: घटनास्थळी आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जात आहे", अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.
पोलिस आयुक्तांनी काय सांगितले?
दरम्यान दिल्लीचे पोलीस आुयक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेची प्राथमिक माहिती दिली. सतीश गोलचा यांनी सांगितले की, आज सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ल्याजवळून संथ गतीने जाणाऱ्या वाहनात स्फोट झाला. वाहनात त्यावेळी काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए, एनएसजी आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी आल्या. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत.
“या घटनेचा तपास केल्यानंतर स्फोटाचे कारण काय आहे, हे सांगू. तसेच स्फोटात काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. नेमका आकडा काही वेळातच जाहीर केला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून घटनेची माहिती दिली आहे. ते फोनवरून वेळोवेळी माहिती घेत आहेत”, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली

Post a Comment