अहिल्यानगर :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेशाचा मुस्लिम मते वळविण्यासाठी वापर केला जातो, अशी छुपी चर्चा सुरू असते. आज पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नरहरी झिरवळ यांनी याला जाहीर स्वरूप देत यावरून महायुतीला ठणकावले देखील. झिरवळ म्हणाले, 'मुस्लिम मतदार भाजपला मते देत नाहीत. त्यामुळे मुस्लिम बाहूल भागातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्या जातात. मात्र, असे चालणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार असेल तर त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत', अशी अपेक्षा झिरवळ यांनी जाहीरपणे बोलून दाखविली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मंत्री झिरवाळ यांची अहिल्यानगरचे संपर्कप्रमुख म्हणून पक्षाने नियुक्ती केली आहे. त्यानुसार झिरवळ यांनी सोमवारी नगरला येऊन पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अरुण तनपुरे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्ष अशा निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्यात
यावेळी झिरवळ म्हणाले की, 'ही निवडणूक स्वबळावर लढवायची की महायुती करून लढवायची, यासंबंधीचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी दोन्ही तयारी ठेवावी. महायुती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्यात ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी, अशीच अपेक्षा आमची आहे. मुस्लिम मतदार भाजपला मते देत नाहीत म्हणून त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायच्या, असे चालणार नाही. अद्याप महायुतीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम ठेवून काम करावे. जे पक्ष सोडून गेले ते पुन्हा निवडून येत नसतात. स्वार्थापोटी जे बाहेर गेले त्यांची फजिती झालेली आपण यापूर्वीही पाहिली आहे. म्हणून उमेदवारी कोणालाही मिळो कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम निष्ठा ठेवून करावे', असं आवाहन झिरवळ यांनी केले.
उमेदवारी देताना हाच निकष लावला जावा
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, 'पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद पाहून महायुती आणि जागा वाटपाचा निर्णय घ्यावा. उमेदवारी देताना हाच निकष लावला जावा. महायुतीच्या माध्यमातून राज्यात चांगले काम होत आहे. त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य. संस्थांच्या निवडणुकांना होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व ठिकाणी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. शहरात तर आम्ही तयार आहोतच, बाहेरही मदत लागली तर त्यासाठी तयार आहोत', असंही जगताप म्हणाले.

Post a Comment