लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुख पदी दळवी, महानगर प्रमुख पदी काळेंची निवड ;
माय नगर वेब टीम
पअहिल्यानगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या दक्षिण लोकसभा संघटक पदी शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुख पदी राजेंद्र दळवी तर अहिल्यानगर महानगर प्रमुख पदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने मुंबई मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने करण्यात आली. निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले. सोमवारी ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर या निवडी जाहीर करण्यात आल्या.
मागील तब्बल बावीस वर्षांपासून शशिकांत गाडे दक्षिण जिल्हाप्रमुख पदी होते. दक्षिणेचे दोन भाग करत गाडे यांच्याकडे नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्याची जबाबदारी होती. तर दळवी यांच्याकडे कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगावची जबाबदारी होती. आता दळवी यांच्याकडे दक्षिणेतील नगर शहर वगळता सर्व तालुक्यांचा पदभार देत त्यांना दक्षिण जिल्हा प्रमुख करण्यात आले आहे. तर गाडे यांच्याकडे दक्षिण लोकसभा संघटक पदाची जबाबदारी दिली आहे.
आता शहर प्रमुख ऐवजी महानगर प्रमुख :
पक्ष संघटनेच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी शहरासाठी शहर प्रमुख होता. ग्रामीण जिल्हाप्रमुखांच्या अखत्यारीत शहर प्रमुख काम करायचे. नगर शहरात महानगरपालिका आहे. त्यामुळे आता ग्रामीण संघटने पासून शहर वेगळे करत स्वतंत्ररित्या महानगर प्रमुख पदाची निर्मिती केली आहे. शहर प्रमुख असणाऱ्या किरण काळे यांच्यावर आता महानगर प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
नांगरे, भोसले, गुंदेचांच्या निवडी :
उपजिल्हा प्रमुख पदी रावजी नांगरे, गिरीश जाधव यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे. माजी उपशहर प्रमुख दीपक भोसले यांना बढती देत उपजिल्हाप्रमुख करण्यात आले आहे. जैन समाजाचा चेहरा असणाऱ्या मनोज सुवालाल गुंदेचा यांच्यावर उपशहर प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Post a Comment