दिल्लीतील भीषण स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरचा क्रिकेट संघ हाय अलर्टवर, समोर आलं आता मोठं कारण..



नवी दिल्ली : 

दिल्लीतील लाल किल्ला परीसरातील कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा संघ हाय अलर्टवर ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरचा रणजी क्रिकेट संघ हा दिल्लीमध्येच आहे. त्यामुळे आता याबाबतची माहिती समोर येत आहे.


जम्मू आणि काश्मीर चा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी दिल्लीत आलेले आहेत. जम्मू आणि काश्मीर व दिल्ली यांच्या संघातील सामना दोलायमान अवस्थेत आहे, कारण या दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. जम्मू आणि काश्मीरच्या संघाला विजयासाठी अजून १२४ धावांची गरज आहे. दुसरीकडे दिल्लीला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना आठ विकेट्स काढावे लागतील. मंगळवार हा या सामन्याचा चौथा आणि अखेरचा दिवस आहे. हा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होत आहे, जिथून स्फोटाचे ठिकाण जास्त लांब अंतरावर नाही. हा स्फोट झाल्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरच्या संघासाठी खास मार्गदर्शक तत्वे आखण्यात आलेली आहेत.


जम्मू आणि काश्मीरच्या संघाचे प्रशिक्षक अजय शर्मा यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, " दिल्लीतील जिथे ही स्फोटकं सापडली होती, तिथून आमचे हॉटेल जवळच आहे, ते जास्त लांब नाही. त्यामुळे आता आम्हाला कडक शब्दांत काही मार्गदर्शक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन आम्हाला आता करावे लागणार आहे. या हल्ल्यानंतर आम्हाला कुठेही हॉटेल सोडून जाण्यास मनाई केली आहे. आम्हाला हॉटेलच्या रुम्समध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. पण ज्या व्यक्ती यापूर्वीच हॉटेलच्या बाहेर गेलेल्या आहेत, त्यांच्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत. पण जे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हॉटेलमध्ये आहेत, त्यांना तिथेच राहण्यास सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टींचे पुरेपूर पालन करणार आहोत. "


दिल्लीतील स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरच्या संघाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पण आता हा सामना उद्या होणार की नाही, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याबाबतचे अपडेट्स सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी पहाटे मिळू शकतील, अशी माहिती आता समोर येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post