पश्चिम बंगालमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; नगरमधील सराफ व्यापाऱ्याचे 51 लाखांचे दागिने हस्तगत



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील सराफ व्यापाऱ्याची फसवणूक करून तब्बल 1 कोटी 1 लाख 5 हजार रुपयांचे दागिने चोरून फरार झालेल्या टोळीतील चार आरोपींना पश्चिम बंगाल राज्यात जाऊन ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे.

या कारवाईत 572.75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत सुमारे ₹51,13,795 रुपये, हस्तगत करण्यात आले आहेत.

फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर (वय 32, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रोड, अहिल्यानगर) हे सोनार व्यवसायिक असून त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या सहा कामगारांनी विश्वास संपादन करून लबाडीच्या इराद्याने दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. 987/2025, बीएनएस कलम 316(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांनी विशेष तपास पथक तयार केले.
या पथकात पोउपनि. संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, प्रशांत राठोड या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने पश्चिम बंगाल राज्यातील हावरा आणि हुगली जिल्ह्यातील अमरागरी, पलाशपाई, सबलसिंगपुर या भागात छापे टाकून आरोपी —

  1. सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक (33),
  2. दिपनकर आरुण माजी (22),
  3. अनिमेश मनोरंजन दोलुई (25),
  4. सोमनाथ जगन्नाथ सामंता (30)
    — यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या साथीदारांमध्ये संतु बेरास्नेहा बेरा यांचा समावेश असल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान आरोपींकडून एकूण ₹51,13,795 किमतीचे 572.75 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनांनुसार व स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेने पार पडली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post