माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - नगर तालुक्याच्या पश्चिम भागात गावागावात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबटे मानवांवर हल्ले करू लागले आहेत. कामरगाव परिसरात हे बिबटे पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे उपलब्ध करून ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांचा शोध घेत बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सहाय्यक उपवनसंरक्षक अश्विनी दिघे यांची भेट घेत निवेदन दिले. यात त्यांनी म्हंटले आहे की, नगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ११ नोव्हेंबर रोजी कामरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्या सोबत अजून काही बिबटे या परिसरात फिरत आहेत.
कामरगाव परिसरात विठ्ठल वाडी, आंधळे वस्ती, जांभळीचा मळा, चौधरी वस्ती, मुरली नगर, खंडोबा रोड सह वाड्या वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. हे बिबटे पकडण्यासाठी वाड्या वस्त्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांचे द्वारे शोध घेण्यात यावा, बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी जंगल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, बिबटे पकडण्यासाठी पिंजरे बसवावेत तसेच या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात यावी अशा मागण्या त्यांनी या निवेदनात केल्या आहेत. सिद्धांत अंधळे यांनी याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ही याबाबत निवेदन दिले आहे.

Post a Comment